Ad will apear here
Next
तुम्हाला ‘पाहता’ येते का?
खरे तर पाहण्याची सवय आपल्याला नसतेच. आपण अनेक गोष्टींवर नुसती दृष्टी टाकत असतो. नजरेत अनेक गोष्टी येतात, पण ‘पाहणे’ होत नाही. त्या प्रक्रियेची आम्हाला सवयच नाही. कला महाविद्यालयांमध्ये चित्र काढण्याची तंत्रे, विद्या आणि कौशल्ये मिळतात. पाहायला शिकवायचा विषय तेथे नाही. चित्रकार म्हणून कर्तृत्व गाजवलेल्यांना पाहता येतेच असे नाही. त्यासाठी सरावाची गरज असते. चित्रे किंवा कला केवळ नजरेखालून घालणे पुरेसे नाही, तर त्या ‘पाहण्याची’ दृष्टी मिळण्यासाठी अनेक प्रयत्न अलीकडे केले जात आहेत. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज त्यावर चर्चा...
............
राकेश मोरे आणि मित्रमंडळींची चित्रांसंदर्भात चर्चालंडनस्थित सुप्रसिद्ध शिल्पकार अनीश कपूर यांची एक व्हिडिओ क्लिप नुकतीच पाहण्यात आली. त्यात, चित्रकृतीकडे पाहण्याबाबत ते म्हणतात, आपण कधीही नुसते पाहत नसतो.... तर प्रेमाने, तिरस्काराने, इच्छेने, भावनांनी किंवा पूज्यभावाने पाहत असतो. एक प्रकारे पाहण्याची क्रिया म्हणजे स्पष्टपणे प्रतिबद्ध किंवा करारबद्ध होण्याची प्रक्रिया आहे.’ (हा व्हिडिओ लेखाच्या शेवटी पाहता येईल.)

खरे तर पाहण्याची सवय आपल्याला नसतेच. आपण अनेक गोष्टींवर नुसती दृष्टी टाकत असतो. नजरेत अनेक गोष्टी येतात, पण ‘पाहणे’ होत नाही. त्या प्रक्रियेची आम्हाला शाळेपासूनच सवय नाही. आमचा भर वाचनावर, अक्षरओळख, पाठांतर, गिरवणे आणि त्याचा सराव वगैरेंवर. पाहणे फार दूर, आम्हाला धड ऐकण्याचीही सवय शाळांमध्ये लावत नाहीत. कला महाविद्यालयांमध्ये चित्र काढण्याची तंत्रे, विद्या आणि कौशल्ये मिळतात. पाहायला शिकवायचा विषय तेथे नाही, म्हणजे आनंदच. चित्रकार म्हणून कर्तृत्व गाजवलेल्यांना पाहता येतेच असे नाही. त्यासाठी बहुधा एका सरावाची गरज असावी. काही अपवाद मात्र असतात. ते जसे पाहतात, तसे इतरांनाही पाहता यावे, यासाठी काही प्रयत्न अलीकडे होताना दिसतात. नाटक व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेले समर नखाते तर याला पाहण्याचा रियाज़ म्हणतात. 

समर नखाते संवाद साधताना...अलीकडे अनेक टप्प्यांमध्ये हे काम त्या त्या समूहाला धरून चाललेले असते. खरे तर पाहण्याची सवय सर्वच माणसांना असते, किंबहुना असायची. माणसे रांगोळी पाहत, तमाशा पाहत, जादूचे खेळ, घराच्या भिंतीवरची चित्रे पाहत. बघण्याची समाजात मुरलेली एक रीत होती. दर्शन घेणे म्हणजे पाहणे का, वगैरे कितीतरी प्रश्न उभे राहू शकतात इथे; पण एका विशिष्ट काळापर्यंत तरी माणसांना पाहण्याची सवय होती. म्हणूनच आपण ज्याला लोककला, आदिम कला, आदिवासी कला म्हणतो, त्या सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग होत्या. 

शहरीकरणाच्या आणि अत्याधुनिक जगण्याच्या प्रक्रियेने टीव्ही पाहणे किंवा एखादा करमणूकप्रधान (जाहिरातीने मोठा केलेला) चित्रपट पाहणे आपण सरावाने जाणतो. परंतु कलाकृती पाहायची आपल्याला सवय नसते. ती लावण्यासाठी किंवा असे काही पाहायचे असते, हे माहीत करून देण्यासाठी काही संस्था व व्यक्ती काम करताना दिसताहेत. 

सुधीर पटवर्धन चित्रे समजावून सांगताना.डॉ. सुधीर पटवर्धन यांनी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये समकालीन कलेचे चित्रप्रदर्शन मांडून त्यातून काही पाहण्याच्या नव्या शक्यता दाखवल्या. त्यांनी ठाण्यातील पोखरण भागात जाऊन लहानशा शेडवजा जागेत आपली चित्रे मांडून कामगारांना व सामान्यांना म्हणजेच गॅलरीत न जाणाऱ्यांना चित्रे पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली; जहांगीर साबावालांसारखे चित्रकार प्रदर्शनादरम्यान लोकांशी चित्रविषयक बोलत असत. त्यांत वय, दर्जा, शिक्षण वगैरेंचा संबंध नसे. अलीकडे बिनाले, कलेबद्र चर्चासत्रे इत्यादी उपक्रम होताना दिसत आहेत. 

अंजू, अतुल डोडिया आणि भूपेन खक्कर चित्रे पाहताना.पुण्यातील सुदर्शन कलादालनात माधुरी पुरंदरे, अभिजित रणदिवे, संदीप देशपांडे, प्रमोद काळे वगैरेंनी जवळपास दहा वर्षे, प्रत्येक महिन्यात कलाविषयक एक चित्रपट प्रदर्शित करण्याचा उपक्रम राबवला. त्याने कलेविषयीच्या जाणिवा किमान पुण्यातील चित्रकारांमध्ये वाढीस लागण्यास मदत झाली. मर्यादित स्वरूपात का होईना, पण काहीतरी वेगळे पाहण्याची सवय लागली. 

चित्रकार आपल्या चित्रावर भाष्य करतात.सुदर्शन येथील चित्रसंवाद उपक्रमात चित्रकार आपल्या चित्रांविषयी बोलतो, उपस्थितांना चित्रे दाखवतो. अर्थातच पाहणारे बहुधा चित्रकारच असतात. चित्रपट कसे पाहावेत, यासाठी मराठी भाषेत सतीश जकातदार वगैरे मंडळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात कार्यशाळा घेताना दिसतात. शॉर्ट फिल्म पाहायची सवय व्हावी म्हणून विशिष्ट ध्येय समोर ठेवून उमेश कुलकर्णी काम करताना दिसतात. पुण्याप्रमाणेच अल्प प्रमाणात कोल्हापूर, औरंगाबाद अशा ठिकाणी लहान-मोठे उपक्रम नवोदित कलावंत करताना दिसत आहेत. त्यांचा भर भारतातील समकालीन कला व पाश्चात्य आधुनिक कला समजावून घेण्यावर असतो. 

चित्र पाहणाऱ्याचे चित्र.दुसरे काही गट कार्यरत आहेत. त्यांचा भर भारतीय कला, विशेषतः प्राचीन मंदिरे वगैरे ‘हेरिटेज’ पाहण्याची लोकांना सवय लावण्यावर आहे. हे काम करताना ‘पाहण्यापेक्षा’ ऐकण्यावर व कथनात्मकतेवर भर असतो.... म्हणजे पाहणे मर्यादित होते. अजिंठा चित्रे कशी पाहावीत किंवा लघुचित्रांमधील सौंदर्यस्थळे, तंत्रे याबाबत जागृतीसाठी श्रीकांत प्रधानसारखे चित्रकार व्याख्याने देताना दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अथवा मुंबईमधीलच भाऊ दाजी लाड संग्रहालय येथे व्याख्याने, लघुपट यांद्वारे दृश्यकला पाहायला, स्वीकारायला किंवा आस्वाद घेण्यासाठी कोर्सद्वारे   प्रशिक्षित केले जात आहे.

कुमार वैद्य आणि बोस कृष्णम्माचारी चित्रावर चर्चा करताना.सध्या पुण्यातील सुदर्शन कलादालनामध्ये मुंबईचे चित्रकार कुमार वैद्य हे थोडा वेगळा प्रयोग करीत आहेत. चित्रकार विद्यार्थी व नवोदित चित्रकार भारतीय समकालीन कलेतील प्रयोग पाहून भारावून जातात. या प्रयोगांमधील अनेक प्रयोग यापूर्वीच जगभरात झालेले दिसतात. असे प्रयोग येथे प्रतिबिंबित होतात आणि येथे नवे काही उमलण्याच्या शक्यता धूसर होतात. या दृष्टीने साधारणतः १९९०नंतर म्हणजे भारतातील संगणकक्रांती व खुल्या अर्थकारण धोरणाच्या काळानंतर जगभरात चित्रकला, शिल्पकला, मांडणीकला इत्यादींमध्ये संकल्पना पातळीवर, प्रदर्शन व सादरीकरणाच्या पातळीवर काय बदल होत आहेत, हे दर्शवणारी आठ भागांची चित्रबोध-३ मालिका आयोजित करण्यात आली आहे. (या उपक्रमाची वैद्य यांनीच थोडक्यात करून दिलेली तोंडओळख पाहा शेवटी दिलेल्या व्हिडिओत.)

दिलीप रानडे चित्रसंवाद कार्यक्रमात बोलताना.त्यामध्ये सध्या जगभर सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रयोग लघुपटाच्या किंवा ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दाखवून, त्याद्वारे पाहण्याचे काही प्रशिक्षण देण्याचा त्यांचा खटाटोप चालू आहे. एकूण १८० जागतिक नव्या कलावंतांच्यातील २५-३० जण निवडून ही परिचय मालिका सुरू आहे. त्यामध्ये कुमार वैद्य हे सोल लेवीटसारखा (Sol Lewitt) नवे प्रयोग मोठ्या आकारात भिंतींवर करणारा कलावंत किंवा डॉरीस सल्सेडोने (Doris Salcedo) ने टेट (Tate) आर्ट गॅलरीमध्ये जमिनीला भेगा गेल्याचा आभास निर्माण करणारी केलेली कलाकृती, अशा प्रयोगांचा परिचय करून देत आहेत. अर्थात या प्रयोगांना कलाकृती तयार करणाऱ्यांची किंवा करू इच्छिणाऱ्यांचीच उपस्थिती असते. 

गजानन परांजपे आणि डॉ. नितीन हडप चित्रे पाहून चर्चा करताना.अनीश कपूर म्हणतात तसे - निव्वळ पाहणाऱ्यांची उपस्थिती अजूनही नगण्य असल्यानेच त्यांच्यासारख्यांनादेखील पाहण्याची क्रिया ही प्रतिबद्ध किंवा करारबद्ध आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देण्याची गरज वाटत असावी.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZXBBT
Similar Posts
लक्ष्मण गोरे यांची कुतुहलापोटीची सहचित्रे! लोकांना खरेच कलेबद्दल काय वाटते, कलेची गरज असते का, असे नाना प्रश्न मनात घेऊन लक्ष्मण गोरे या तरुण चित्रकाराने सहचित्रांचे प्रयोग शहरी आणि ग्रामीण भागात केले होते. त्यात सगळ्यांनी एकत्र येऊन चित्रे काढणे अभिप्रेत होते. त्यात, चित्रकार आणि चित्रकार नसलेले असे सगळे कोणत्याही भेदभावाशिवाय एकाच कॅनव्हासवर चित्र रंगवतात
मुंबईचा ठग : दी बॉम्बे ब्युकनर एखाद्या समकालीन चित्रकाराच्या प्रगतीचा आलेख पहायचा झाल्यास अतुल डोडियांच्या चित्रांचे उदाहरण यथोचित ठरावे. नव्या पिढीसाठी अतुल डोडियांनी नवे पायंडे निर्माण केले आहेत. जुन्या प्रतिमा घेऊन त्यांना नव्या स्वरूपात दाखवतात आणि सराईत ठगाप्रमाणे त्या प्रतिमा चक्क नव्याच दिसतात. या अर्थाने ते चित्रकलेतील मुंबईचे ठग ठरावेत
लघुपटातून पाहिलेला चित्रकार ‘नैनसुख’ नैनसुख हा पहाडी शैलीतील लघुचित्रे काढणारा चित्रकार १८व्या शतकात होऊन गेला. नावाप्रमाणेच त्याची चित्रे डोळ्यांना सुखावणारी आहेत. प्रा. डॉ. बी. एन. गोस्वामी यांनी त्याच्यावर संशोधन केले असून, अमित दत्ता यांनी त्याच्यावर उत्तम लघुपट तयार केला आहे. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज नैनसुख आणि त्याच्यावरील लघुपटाबाबत
सत्संग... डेरा सच्चा सौदा, आसारामबापू अशा कथित आध्यात्मिक गुरूंना शिक्षा झाल्याच्या घटना अलीकडच्या काही काळात पाहायला मिळाल्या. त्यावर भाष्य करणारे अनेक लेख, चित्रे, व्यंगचित्रेही माध्यमांतून प्रसिद्ध झाली; मात्र भूपेन खक्कर नावाच्या कलाकाराने पंचविसेक वर्षांपूर्वी म्हणजे अशा प्रकारांची जेमतेम सुरुवात असतानाच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language